
रायगडाची सफर – स्त्रीशक्तीसाठी अविस्मरणीय अनुभव
दि. ८ मार्च २०२५ रोजी गडझुंजार प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रात्री 11 वाजता कात्रज येथून प्रवास सुरू झाला. गड सर करण्याचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पहाटे 3.30 वाजता पाचाड येथे पोहोचल्यानंतर थोडी विश्रांती, नाश्ता आणि तयारी करून गड चढण्यास सुरुवात झाली.
पहाटेच्या गारव्यामुळे चढण अधिक सुखकर झाली. वाटेत गडाचा दरारा अनुभवताना प्रत्येक जण इतिहासाच्या साक्षीदार ठिकाणांशी जोडला गेला. साधारण 8 वाजता महादरवाज्यातून प्रवेश करताच शिवकालीन वैभवाचा भव्य अनुभव आला.
यानंतर बालेकिल्ला, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि टकमक टोक ही ऐतिहासिक स्थळे पाहताना त्या सुवर्णकाळाचा प्रत्यक्ष स्पर्श झाल्यासारखे वाटले. स्वराज्य उभारणीच्या संघर्षाची जाणीव प्रत्येकाला नव्याने झाली.

एक प्रेरणादायी प्रवास
दुपारी 1.30 वाजता गड उतरण्यास सुरुवात झाली. सूर्याच्या प्रखरतेमुळे वाट थोडी कठीण झाली, पण या संपूर्ण प्रवासाने आत्मविश्वास अधिक दृढ झाला. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर पाचाड येथे जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेताना मन भारावून गेले.
या मोहिमेतून इतिहासाची जाणीव, स्वराज्याचा अभिमान, आत्मविश्वास आणि साहस यांचा एक अद्वितीय अनुभव मिळाला. रायगडाच्या भक्कम तटबंदीप्रमाणेच स्वतःमध्ये बळ निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. शिवरायांच्या नेतृत्वगुणांप्रमाणे प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उभं राहावं, हीच या मोहिमेमागची भावना होती.
या यशस्वी मोहिमेचे संपूर्ण श्रेय गडझुंजार प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट नियोजनाला जाते. ट्रेक लीडर्स, स्वयंसेवक आणि व्यवस्थापकांनी संपूर्ण प्रवास सुरक्षित आणि संस्मरणीय बनवला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा अनुभव फक्त एक ट्रेक न राहता, आयुष्यभराची प्रेरणा देणारा प्रवास ठरला.
गडझुंजार प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार… 🚩🙏








